Wednesday, February 26, 2014

माझे जंगल... जंगलं संरक्षीत करण्यात आली खरी पण त्यामुळे कुठेतरी जंगलाशी असणारं आपलं घनिष्ट नातं आता फक्त पर्यटन ह्या विषयाच्या पलिकडे जात नाही / विषयाशी येऊन थांबत. मोठ्या प्रमाणात होणारी परदेशी झाडांची लागवड देखील जगलांना मारक ठरते. देवरायांचं अस्तित्वही हळूहळू धोक्यात येत आहे. मालकीच्या जागेवर असलेली जंगलसंपदासुध्दा नफ्याच्या भडाग्नीला बळी पडत आहे. जंगल जपणं, वाढवणं, त्याच्या सानिध्यात रहाणं हे आपण केंव्हाच मागे टाकले आहे. ह्या सर्व प्रवाहाविरूध्द जाण्याची मनिषा बाळगाणारे आपल्यासारखे निसर्ग प्रेमी आहेत. पण ह्या प्रवाहाच्या जबरदस्त ओघाविरुध्द जाण्यासाठी आपली एक मजबूत साखळी बांधणं आवश्यक आहे. अशा साखळीव्दारे "माझं जंगल" ही जंगल संवर्धन संकल्पना सह्याद्री निसर्ग मित्र राबवत आहे. केवळ एका जागेपुरते राबवायची ही संकल्पना नसून "माझं जंगल" हा विचार जनमानसात रुजवला जाईल जेणेकरून विविध ठिकाणी अशी स्वयं प्रेरीत जंगलं वाढतील. सर्व निसर्गप्रेमींना ही जंगलं खुली असतील. इथे येऊन जबाबदारीने निसर्ग संवर्धनाची कामे करणं, निरिक्षणं करणं, व्यवस्थित नोंदी ठेवणं हे अपेक्षीत आहे. परत एकदा आपलं जंगलाशी नातं जोडणारी ही प्रयोगभूमीच म्हणा ना! सह्याद्रीच्या ’रोजी रोटीतून निसर्ग संवर्धन’ ह्या तत्वाला अनुसरुन स्थानिकांनाही ह्या कामात जोडून घेण्यात येईल. पुढील एक वर्षाच्या काळात सह्याद्रीने ५० एकर जागेवर अशा पध्दतीने जंगल संवर्धनाचे उद्दीष्ट ठरवले आहे तर पुढील तीन वर्षाच्या काळात १०० एकराचे उद्दीष्ट ठरवले आहे. मनापासुन ज्यांना निसर्ग संवर्धन करावेसे वाटते त्यांनी या "माझे जंगल" संकलपनेत सहभागी व्हावे. संपर्क - रामाशिष जोशी - ९३२४३ ९९३४७ / भाऊ काटदरे - ९४२३८ ३१७०० ईमेल- sahyadricpn@gmail.com ही संकल्पना राबवताना सह्याद्री खालील तत्वांचे काटेकोरपणे पालन करेल: प्रयोगशीलता : ९०% जागा जंगल संवर्धन ह्या एकमेव उद्दीष्टासाठी वापरली जाईल. ह्यासाठी तद्न्यांच्या मदतीने परिसर व इतर जैवविविधता संवर्धनानुरुप झाडांची निवड केली जाईल. साधारणपणे पाच टक्के जागा प्रयोगभूमी म्हणून वापरली जाईल. साधारणपणे पाच टक्के जागा केवळ जंगलाशी संबंधीत उत्पन्नासाठी राखली जाईल. प्रत्येक जंगल प्रकल्प स्वयंपूर्ण करण्यासाठी ह्या उत्पन्नाचा वापर केला जाईल. जंगल संवर्धन निधी : जंगल संवर्धन आणि त्यासंदर्भातील विविध कामासाठी सह्याद्री निसर्ग मित्र रु. १ कोटी इतका निधी उभा करेल. सह्याद्री निसर्ग मित्र एका वेगळ्या बॅंक खात्यामधे ’जंगल संवर्धन निधी’ जमा करेल. हा निधी फक्त जंगल संवर्धनाच्या कामांसाठी, ’माझं जंगल’ ह्या संकल्पनेखाली नविन जागा घेण्यासाठी किंवा त्यापोटी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात येईल. कुठल्याही नव्या नाव नोंदणीची रक्कम ह्या निधीत जमा केली जाईल. मालकत्व: ह्या जागेचे मालकत्व सह्याद्री आणि इतर निसर्गप्रेमी ह्यांमधे सामायिक राहील एखाद्या निसर्गप्रेमीच्या पश्र्चात तो भाग / त्याचे मालकत्व संस्थेकडे येईल. सहभाग : रु. ५०,०००/- भरून नविन नाव नोंदणी करून अधिक निसर्गप्रेमींना ह्या संकल्पनेत सहभागी होता येईल. देणगीदारांना ह्या जागेच्या विविध भागांच्या संवर्धनासाठी देणगी देऊन (८० ग ची सुवीधा उपल्ब्ध) आपले नाव ह्या संकल्पनेत सहभागी होता येईल. सहभागी लोकांची व त्यानी वाचवलेल्या जंगला बद्दल सविस्तर प्रमाणपत्र तसेच वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली जाईल. अभ्यासू निसर्गप्रेमींना संस्थेने मान्य केलेले प्रयोग प्रयोगभूमीत करून किंवा चाललेल्या कामांत हातभार लावून ह्या संकल्पनेत सहभागी होता येईल. अत्यंत साधी रहाण्याची सोय प्रयोगभूमीत केली जाईल. पूर्व परवानगी काढून व ह्या ठिकाणी रहता येईल व आपला जंगल करिता येईल. पाच वर्षांसाठी शून्य % व्याजी कर्ज स्वरूपात रक्कम देऊन निसर्गप्रेमींना ह्या संकल्पनेत सहभागी होता येईल. ह्या बदल्यात अशा निसर्गप्रेमींना पूर्वपरवानगी काढून ठराविक दिवस रहाण्याची मुभा ५ वर्षांसाठी मिळेल. रोजीरोटीतुन निसर्ग संवर्धन या ब्रीद प्रमाणे स्थानिक लोकांना या प्रक्ल्पात सहभागी करण्यात येईल. त्यांनी त्यांच्या जागा विकू नयेत त्यावरील जंगल वाढवावे व त्याच मध्ये पर्यटन वाढवुन स्थानिकांना उत्पन्न मिळेळ. तसेच गम कराया सारख्या व्रुक्षांची वाढ करुन त्यापासुन उत्तम गम मिळवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण करण्यात येईल. तसेच ईतर औषधी वनसपती ईत्यादी पासुन उत्पन्न मिळवुन स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी विकू नयेत, त्यावरील जंगल तोडू नये यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

वीर... एक अनुभव...

महाराष्ट्र टाईम्समध्ये एक आर्टीकल आले. चिपळूण जवळच्या एक नितांत सुंदर गाव. गावाचे नाव ’वीर बंदर’. नारळ, पोफळीचा बनात बुडालेले व निसर्ग सौंदर्याने नटलेले एक गाव. रात्रंदिवस शुभ्रधवल प्रपाताच्या धीरंगभीर आवाजात रमलेले आणि निळ्याशार खाडीपासून अगदी जवळ असलेले गाव. होड्यांची ये-जा करुन दोन्ही तीरावरील माणसांना जवळ आणणारे गाव.
हे सगळं स्वप्नवत नसलं तरी सत्यात असणार्‍या ’वीर बंदर’ या कोकणातील एका निसर्गरम्य गावाचा जगाशी परीचय करुन देणारा लेख श्री. उदय पंडीत या पर्यटन प्रेमी व मानवतेचे नाते अत्यंत आपुलकीने जपणार्‍या एका पत्रकाराने रेखाटला आणी आपल्या अशाच एका पर्यटनवेड्या मित्राने ’केरबा हंडे’ य़ांनी तो वाचता क्षणीच सर्व निसर्गप्रेमी मित्रांना त्याने धडाधड फोन केले आणि दोन दिवसात आम्हां आठ निसर्गप्रेमींचा गट ’वीर बंदर’ च्या निसर्ग दर्शनासाठी सज्ज झाला. आणि आमचा सारथी मित्र मोहन पाटील आपली सुमो घेऊन तत्परतेने हजर झाला.
इकडे श्री. उदय पंडीतांनी वीर गावातील अत्यंत आनंदी, पर्यटन प्रेमींची आपुलकीने आदरातिथ्य करणार्‍या श्री. त्रिविक्रम वीरकर उर्फ नाना यांच्याशी संपर्क करण्यास सांगीतल्यावर केरबा आणी त्यांचे सहकारी मुसद्दीक शेख यांनी वारंवार फोन करुन ’वीर बंदर’ गावातील सर्व कार्यक्रम सवीस्तर आखला आणी.....
.. आम्ही आठ निसर्गप्रेमी केरबा, मुसद्दीक, सुनील, गजानन, प्रकाश, आर्कीटेक्ट अरविंद आणि आर्कीटेक्ट हेमंत व मी आर्कीटेक्ट दिलीप कुलकर्णी कोल्हापुरातून बुधवारी सकाळी ७.०० वाजता आमच्या सारथी मोहन पाटील सोबत ’वीर बंदर’ गावाकडे मार्गस्थ झालो. सकाळच्या थंडगार वार्‍याबरोबर आमची सुमो, वार्‍यासारखीच वाघबीळ, मलकापुर, आंबाघाट, साखरपा-देवरुख, संगमेश्वर असे करत गोवा-मुंबई एनएच-१७ महामार्गावरुन चिपळूणकडे मार्गस्थ झाली. सुमोत बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या मित्रांच्या गप्पागोष्टी आणी थट्टामस्करीला अगदी ऊत आला होता.
चिपळूणच्या अलीकडे २५ किलोमिटर आधी पश्चिमेला एक फाटा जातो तो छोटी, छोटी गावे पार करत लहान लहान खडबडीत होत शेवटी ’वीर बंदर’ गावात पोहोचला. खडतर मार्गावरुन आमच्या मोहन पाटलांनी कसरत करत दुपारी १२ च्या दरम्यान आम्हाला नानांच्या घराच्या अलीकडे सोडले व नानांच्या घरचा पत्ता विचारत नारळ पोफळीचा बनातुन उतरत्या वाटेने ट्रेकिंगचा आनंद घेत आम्ही नाना वीरकरांच्या घरी दाखल झालो आणी वीरकर या अत्यंत उमद्या, आनंदी व्यक्तीमत्वाशी आमची गाठ पडली.
अत्यंत आदरातिथ्यपुर्वक आमच्या सर्वांना त्यांच्या छोट्या परंतु, थंडगार पण घरातील मायाळू  गृहीणी व मायाळू नानांचे चिरंजीव यांच्या आपुलकीने उबदार असणार्‍या घरात आम्ही स्थानापन्न झालो. ओळखीची, माहीतीची देवाण-घेवाण घेऊन आपुलकीच्या गप्पा आपसुकच सुरु झाल्या.
परंतु, भोवतालचा निसर्ग आम्हाला खुणावत होता. त्यामुळे पुन्हा त्या नारळी पोफळीच्या बनातून वाट काढत नानांचे चिरंजीवांच्या सोबतीने आम्ही निसर्गातुन रमत गमत, पक्षांचे विविध आवाज ऐकत, पानांची खळखळ ऐकत मार्गक्रमण करता करता धीरगंभीर पाण्याच्या आवाजाशी जवळीक साधत आम्ही अचानक एका सुंदर निसर्गाच्या एका शिल्पाजवळ केव्हा येऊन पोहोचलो, आम्हालाच कळले नाही. निसर्गातील संगीतातील सरगम साधत धैवताची बरोबरीने साद घालणार्‍या, फेसाळणार्‍या एका नितांत सुंदर धबधब्यापाशी आम्ही आचंबीत नजरेने एकदम पापण्यांची हालचालही न करता स्तंभीत होऊन या निसर्ग शिल्पाकडे एकटक पहातच राहीलो.
निळ्याशार जलाशयात साधारण १०० फुट उंचीवरुन फेसाळत वाहणार्‍या जलप्रपाताशिवाय हिरव्यागार झाडीने व्यापलेला कडा, निळेभोर आकाश आणि त्यात झालेले आम्ही पामर. देवाच्या करामतीबरोबरच निसर्गाने भरभरुन अनेक करामती बहाल केलेल्या या ’वीर बंदराच्या’ तर आम्ही प्रेमातच पडलो. जलप्रपातात मनसोक्त डुंबून आमच्या शहरी जिवनातून मुक्त होण्याचा आनंद घेत, आमचा तास दीड तास कसा निघून गेला हे कळलेच नाही. परंतु आमच्या आदरातिथ्यात कोणतीही कसुर न ठेवलेल्या आमच्या यजमानांना आणखी थांबवणे इष्ट न वाटल्याने अत्यंत नाईलाजाने आम्ही तेथुन काढता पाय घेतला.
घरी जेवणाची तयारी जय्यतच, अत्यंत साध्या, पण रुचकर स्वैयंपाक. गरम भात, मऊशीर पोळी, भाजी, आमटी, कोशींबीर व शेवटी फक्कड ताक. आग्रह करुन वाढणार्‍या माऊलीचे हात. मग काय पोटभरापेक्षाही जास्तच उदरभरण करुन सर्वांनी समाधानाचे ढेकरावर ढेकर देत महत्वाचा कार्यक्रम उरकला, तर ताबडतोब नानांनी छानपैकी सारवलेल्या अंगणात वामकुक्षीसाठी आमच्या पथार्‍या पसरल्यादेखील.
सुपारीच्या वनात व नारळ पोफळीतुन मंद वाहणार्‍या वार्‍याने आमच्यासाठी जणू अंगाईच गाईली आणी आम्हा सर्वांचा डोळा घटकाभर का होईना लागला तो आम्ही जागे झालो नानांच्या आपुलकीच्या हाकेने, नानांचे चिरंजीव आम्हाला खाडीवर घेऊन जायला त्यांच्या सवंगड्याच्या सह तयार होते. मोहन पाटलांनी गाडीत आमची वरात घालून आस्तेआस्ते करत, खाडीकडे प्रयाण केले. गावातील देऊळ, वाड्या, निसर्ग झाडे, ओढ्यातील दगड गोट्यातुन वहाणारे मंजुळ पाणी, वाड्यातील घरे पहात आम्ही खाडीजवळ गेलो.
नितांत, सुंदर, अफाट पसरलेले खाडीचे दृश्य असेच आनंद देणारे खाडीवरुन वाहणारी मंद वा-याची झूळूक, लाटांवर या झुळझुळणा-या छोट्या मोठ्या होड्या व बंदराच्या जेटीवर आम्ही पुन्हा निसर्गात बुडलेलो आठजण. कितीवेळ गेला माहीती नाही. खाडीच्या पल्याडच्या रतीरावरुन काही लोकांच्या हाकांनी आम्ही जागे झालो. खाडीच्या तीरावरुन नेहमी ये-जा करणार्‍या लोकांच्या हाकार्‍या नेहमीप्रमाणे नावाडयांना पुकारत होत्या.
थोडावेळ असाच निसर्गाचा आस्वाद घेऊन आम्ही जडपावलांनी वीर बंदर चा निरोप घेतला. त्याचप्रमाणे आमच्या आदरातिथ्य प्रीय, अनंत जन्माचे आमचे लागेबांधे जुळलेल्या नाना वीरकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या निरोप घेऊन आम्ही परत चाललो आमच्या शहराकडे. पुन्हा त्या धकधकीत, कामाचा व्याप ओढणार्‍या, पण परत या व अशाच ’वीर बंदर’ च्या निसर्गात पुन्हा रममाण होण्याच्या भविष्यातील आमच्या निर्धाराला सोबत घेऊन.
आर्किटेक्ट दिलिप कुलकर्णी
कोल्हापूर
दि. २० जानेवारी,२०१४